मुंबई - खार, वांद्रे, जुहू आणि सांताक्रूझ परिसरात घरफोड्या करणारी दुकलीच्या मुसक्या खार पोलिसांनी आवळल्या आहेत. अंदाजे ३ कोटीची मालमता पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केली आहे. किशोर नंदेश पवार उर्फ बंटी आणि राहुल रवींद्र गुरव अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना आज पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४, जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ आणि वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.
खार पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्हा दाखल झाला असता पोलिसांनी तपासकामी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सीसीटीव्हीचे तपास करत असताना बंटी आणि गुरव या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोन्या - चांदीचे दागिने, बांगड्या, अंगठ्या, विविध कंपनीची किंमती घड्याळे, मोबाईल फोन, किंमती पेन आणि घरफोड्या करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे असा ऐवज हस्तगत करण्यात आला असून या मालमत्तेची किंमत अंदाजे ३ कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.