नांदुरा (बुलडाणा) : युवाशक्ती जागरण मंच विदर्भ मुख्यालय वडनेर भोलजी या संस्थेंतर्गत महिला बचत गटांना कमी किमतीच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून बुलडाणासह जळगाव जिल्ह्यातून कोट्यवधी रुपये जमा केल्यानंतर त्या वस्तू न दिल्यामुळे गुन्हे दाखल झालेला विजय गव्हाडचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सोमवारी नांदुरा पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
वडनेर येथील विजय गव्हाड नामक व्यक्तीने सन २०१८-१९ मध्ये युवाशक्ती जागरण मंच विदर्भ मुख्यालय वडनेर या नावाने बुलडाणा जिल्ह्यात बचत गट स्थापन केले. क्षेत्रीय अधिकारी म्हणून काही बेरोजगार तरुणांची नेमणूक केली होती. त्या तरुणांनी बचत गटाच्या सदस्यांना २५०० रुपयांत चक्की, ३० हजार रुपयांत दुचाकी, ५ हजार रुपयांत लॅपटॉप, ३० हजार रुपयांत गाय, ५ हजार रुपयांत इलेक्ट्रिक मोटार पंप, ५०० रुपयात फवारणी पंप, ट्रॅक्टर, बोलेरो, पिकअप या व अशा विविध साहित्य व वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून नगदी पैसे गोळा केले. त्यापोटी पावत्याही दिल्या. सुरुवातीला काही लोकांना वस्तू दिल्या. तसा विश्वास आल्याने मोठ्या प्रमाणावर गावागावांतून पैसे गोळा करण्यात आले. परंतु पुढे पैसे देऊन बरेच दिवस झाल्यामुळे काही महिलांनी गव्हाड यांच्याकडे वस्तूची मागणी केली. आज-उद्या देतो, असे करत बरीच महिने निघून गेले. ठरलेले साहित्यही मिळत नसल्याने २०२० मध्ये विजय गव्हाड याच्या विरोधात नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून विजय गव्हाड हा फरार होता.
दोन वर्षांपासून फरार असलेल्या विजय गव्हाड याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला. तो अर्ज गेल्या आठवड्यात न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे पोलिसांपुढे समर्पण करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याने विजय गव्हाडने नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वडनेर (भोलजी) येथील पोलीस चौकीत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मानकर करीत आहेत.
- २०१९ च्या विधान सभेत उमेदवारविजय गव्हाड याने मलकापूर विधानसभेची सन २०१९ ची अपक्ष निवडणूक बांगडी या चिन्हावर लढवून राजकीय नशीब आजमावले होते. या निवडणुकीत त्याला अंदाजे ११ हजारांच्या जवळपास मते मिळाली होती.