पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ (Paytm Founder and CEO) विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांना दक्षिण दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, विजय शेखर शर्मा यांच्या भरदाव वेगानं जाणाऱ्या जग्वार लँड रोव्हर कारने दक्षिण दिल्लीतील डीसीपींच्या कारला धडक दिली. इतकंच नाही, तर यानंतर ते आपली कार घेऊन घटनास्थळाहून निघून गेले होते.
यानंतर डीसीपींचे चालक दीपक कुमार यांनी या प्रकरणी FIR दाखल केली होती. या अपघातात त्यांना दुखापत जाली नाही. परंतु विजय शेखर शर्मा यांना वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवण्याच्या आरोपाखाली २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीच्या नंबरची नोंद केली होता. त्यानंतर त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. तपासात ही गाडी एका कंपनीच्या नावे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या अपघाताच्या वेळी ग्रेटर कैलाश पार्ट २ मध्ये राहणारे विजय शेखर शर्मा गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शर्मा यांना पोलीस स्थानकात बोलावण्यात आलं आणि त्यांना अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर त्यांना जामिनही देण्यात आला.