लखनऊ – कानपूरमधील ८ पोलिसांच्या हत्याकांडाचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याचा शुक्रवारी पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला गोळ्या झाडल्या. २ जुलै रोजी कानपूरमध्ये पोलिसांची हत्या केल्यानंतर विकास दुबे फरार झाला होता. कानपूरहून फरीदाबाद, तिथून उज्जैन असा प्रवास त्याने केला. मागील ७ दिवसांपासून विकास दुबे फरार होता.
विकास दुबेला अटक केल्यानंतर त्याच्याकडून काही सामान जप्त करण्यात आलं होतं, फरार असताना तो त्याच्यासोबत एक बॅग घेऊन फिरत होता. सूत्रांच्या माहितीनुसार या बॅगेत काही कपडे, मोबाईल फोन, चार्जरसह महत्त्वाची कागदपत्रेही होती. याच मोबाईल फोनमधून तो अनेकांच्या संपर्कात होता. फोनवर बोलल्यानंतर तो मोबाईल स्विचऑफ करत असे. या फोनमधून त्याने वकिलांशी, त्याच्या निकतवर्तीयांच्या संपर्कात होता. विकास दुबेकडे बनावट आयडी कार्डही सापडलं आहे.
ज्यापद्धतीनं विकास दुबे मोठ्या शिताफीनं लोकेशन बदलत होता, त्यामुळे त्याला पोलिसांच्या हालचालींबाबत कोणतीही आतमधून माहिती पुरवत असल्याचा संशय होता. चौबेपूर प्रकरणात पोलिसांनीच त्याला माहिती दिल्याचं उघड झालं होतं, यात पोलीस अधिकारी विनय तिवारी याला अटक करण्यात आली. तिवारीसोबत केके शर्मा यांनाही अटक झाली. गॅंगस्टर विकास दुबेला वाचवण्यासाठी पोलीस अधिकारी मदत करत होते. पोलीस चौकशीत विकास दुबेने केके शर्माला फोन करुन धमकी देत पोलिसांना गावात येण्यापासून रोखण्यास सांगितलं. सध्या पोलीस चौबेपूर प्रभारी विनय तिवारीसह अन्य ७ लोकांची कस्टडी मागत आहे. विनय तिवारी याची पोलीस चौकशी करत आहेत.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेश एसटीएफच्या गाडीतून विकासला कानपूरला नेलं जातं होतं. त्यावेळी बर्राजवळ गाडीला अपघात झाला. गाडी उलटल्यानं विकास दुबे आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र यानंतरही विकासनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानं एका एसटीएफ अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र विकासनं पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. यानंतर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली. विकास दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चकमक सुरू झाली. त्यामध्ये विकास दुबे गंभीर झाला. त्यानंतर त्याला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार
गाडी उलटताच बंदूक हिसकावून विकास दुबेचा पळून जाण्याचा प्रयत्न; रस्त्याच्या शेजारीच एन्काऊंटरचा थरार