मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या ट्रॉम्बे पोलिसांनी विक्रांत युद्धनौकेचे संवर्धन प्रकरणी बजावलेल्या समन्सला शनिवारी गैरहजर राहिले. मात्र, सोमय्या यांच्या वकिलांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाऊन दोघांनीही याप्रकरणी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे पोलिसांना कळवले आहे. पोलिसांनीही अटकपूर्व जामिनाच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत पोलिसांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याबाबत सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे संवर्धन करण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करण्यात आला. ही जमा झालेली रक्कम राज्यपाल कार्यालयात जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम ४३ (अ) अंतर्गत किरीट व नील सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती. पण चौकशीसाठी हे दोघेही सकाळी ११ वाजता हजर राहिले नाही. तसेच, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून यावर काय सुनावणी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील या दोघांना शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, सोमय्या पितापुत्रांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत शनिवारी चौकशीला येणे टाळले आहे.