काशिनाथ वाघमारेसोलापूर : एकाच रात्रीत ग्रामपंचायत सदस्यासह सहाजणांची घरं फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या रोकडसह दागीने पळविल्याची घटना शनिवार, २७ मे राेजी पहाटे पंढरपूर तालुक्यात सुस्ते (ता. पंढरपूर) येथे उघडकीस आली. विशेषत: ग्रामपंचायत सदस्य विष्णू गावडे हे घरात झोपले होते, भाऊ व कुटूंब गच्चीवर तर आई-वडिल घराबाहेर झोपूनही घरफोडी झाली.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून सर्वसामान्य उखाड्याने त्रस्त झाले आहेत. सुस्ते येथे दरवाजे उघडे ठेवून काही लोक झोपी गेले. मात्र ग्रामपंचायत सदस्य विष्णू बबन गावडे हे हॉलमध्ये झोपी गेले होते तर त्यांचे भाऊ व कुटूंब हे गच्चीवर आणि घराबाहेर आई-वडिल झोपले असताना चोरट्यांनी मध्यरात्रीत त्यांच्या घरात प्रवेश केला. प्रारंभी गावडे यांचे घर फोडून १ लाख २० हजार रुपये रोख आणि आणि सात तोळे दागिने असा एकूण ४ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज पळवला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा आरिफ दगडू शेख, आभार उस्मान शेख, सरदार अकबर शेख, रसूल अकबर शेख, सैपन माणिक शेख यांच्या घराकडे वळवला. या पाचही जणांच्या घरातून रोख ८० हजार रुपये आणि दागिने पळविले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस हवालदार नितीन चवरे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर, सुजित उबाळे, पोलिस पाटील मनिषा कांबळे यांनी धाव घेतली. फिंगरप्रिंट आणि डाॅगस्काॅडला पाचारण करण्यात आले. पुढील तपास पोलिस हवालदर नितीन चवरे हे करत आहेत.अॅपचे बिल भरले नाही,ग्रामसुरक्षा यंत्रणा हतबल
पोलिस पाटील मनिषा कांबळे यांना शनिवारी पहाटे पावणे तीन वाजता वठारवाट येथे चोरी झाल्याचा फोन आला. त्यानंतर त्यांनी गावातील नागरी ग्राम सुरक्षा यंत्रणेला फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामपंचायतीने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या अॅपचे वार्षिक बील भरले नसल्याने फोन लागला नाही. या सा-यांच्या घरफोड्या १५ मिनीटांच्या अंतराने घडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे.