जळगाव : पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील बाभळेनाग गावात घडली आहे. एका तरुण-तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याने गावातील लोकांकडून त्यांचा छळ सुरु झाला आहे. या दोघांनी गाव सोडून जावं म्हणून तरुणाच्या कुटुंबीयांनाही अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याचा आरोप या जोडप्याने केला असून बुधवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट देऊन मदतीची याचना केली.
बाभळेनाग गावातील एका तरुण-तरुणीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरजातीय विवाह केला. हे दोघे जण ४ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. विवाह केल्यानंतर दोघांना तरुणीच्या घरच्यांकडून विरोध व्हायला लागला. गावातील इतर लोकही त्यांचा छळ करू लागले. तरुणाच्या कुटुंबाने हा विवाह मोडून गाव सोडून जावं म्हणून दबाव टाकला जाऊ लागला. छळ असह्य झाल्यानं दोघांनी पारोळा पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. शेवटी तरुणाने राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडे आपली कैफियत मांडली आहे.
दोघेही पदवीधर, एक ग्रा.पं. सदस्य आंतरजातीय विवाह करणारे दोघेही पदवीधर आहेत. तरुण तर ग्रामपंचायत सदस्यही आहे. दोघांनी परस्पर संमतीने विवाह केला असला तरी त्यांना विरोध होत आहे. आपल्याला न्याय मिळावा, अशी विनंती त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना समक्ष भेटून केली.
धक्कादायक! नवजात बालकाचा मृतदेह तोंडात घेऊन भटकत होता कुत्रा, पाहून लोकांना बसला धक्का
या घटनेतील पीडित जोडप्याने आपली भेट घेऊन तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई पण केली आहे. पीडित जोडप्याला संरक्षण देण्यात येईल. - डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक