रत्नागिरी- जमावबंदी आदेशासह कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य दोन पदाधिकाऱ्यांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनआशीर्वाद यात्रेपासून सुरू झालेले भाजपमागचे शुल्ककाष्ठ अजूनही संपलेले नाही. ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्यापासूनच नाट्यमय घडामोडी घडत आहेत. प्रथम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात यावी यासाठी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेने आंदोलन केले. त्यानंतर मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली.
महाडमधील न्यायालयाने मंत्री राणे यांना जामीन मंजूर केल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून जनआशीर्वाद यात्रेला परवानगी मिळाली नाही. त्याऐवजी महापुरुषांचे दर्शन आणि दोन बैठका एवढेच कार्यक्रमाचे स्वरुप ठेवण्यात आले. त्यातही या यात्रेत चार कार्यकर्त्यांची सोन्याची चेन चोरीला गेली.
आता या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले तसेच सामाजिक अंतर, मास्कचा वापर अशा कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, संकेत बावकर आणि प्रफुल्ल पिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्सेटबल लक्ष्मण कोकरे करीत आहेत.