लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना पहायला मिळत असून. गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकार्यालय समोर प्रचंड गर्दी जमली होती. त्या सर्वांनी कोरोना नियमाचे उल्लंघन केले. यामुळे पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडा तात्या कराडकर, विकास शंकर जवळ, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग अधिनियमन ३ तसेच १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) व १३५ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधत अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात मात्र सातारा शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.