नवी दिल्ली - उत्तराखंडच्या अंकिता भंडारी हत्याकांडात रोज नवनवीन खुलासा समोर येत आहे. मृत्यूपूर्वी अंकितानं तिच्या मित्राला रिसोर्टमध्ये सुरू असलेल्या अश्लिल कृत्याबाबत सांगितले होते. अंकिता रिसोर्ट मालकाच्या दबावाला बळी न पडल्याने शिकार झाली. अंकिताला जाळ्यात ओढण्याचा डाव रचला परंतु तो यशस्वी न झाल्याने तिला संपवण्यात आले. मृत्यूनंतर अंकिताचा मित्र आणि पुलकितमध्ये झालेलं संभाषण आणि सीसीटीव्ही फुटेज यावरून पोलिसांना अनेक धागेदोरे हाती लागले आहेत.
अंकितानं अखेरच्या वेळी जम्मूमध्ये राहणाऱ्या मित्रासोबत चॅट केले होते. हे चॅट समोर आल्यामुळे अंकिताच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. १७ सप्टेंबरच्या एकदिवस आधी अंकिता खूप चिंतेत होती. तिने मित्र पुष्पसमोर वनंतरा रिसोर्टमध्ये सुरु असलेल्या कृत्याची पोलखोल केली. ज्याठिकाणी अंकिता रिसेप्शनिस्टमधून काम करत होती. १७ सप्टेंबर २०२२ रात्री ९ वाजून ३५ मिनिटांचे हे चॅट आहे.
काय आहे या चॅटमध्ये वाचा...अंकिता - या रिसोर्टमध्ये मला इनसिक्योर फील होतंय, अंकित माझ्याजवळ आला आणि म्हटलं तुझ्याशी बोलायचं आहे. मी त्याच्यासोबत गेली. पुष्प - कॉल करून सांग काय झालं?अंकिता - नको, आवाज येईलपुष्प - ओके, मॅसेजमध्येच सांगअंकिता - सोमवारी VIP गेस्ट येणार आहेत, त्यांना एक्स्ट्रा सर्व्हिस पाहिजे. मी म्हटलं मी काय करू. तो म्हणाला तू सांगितले होते स्पा वैगेरे करेन. मी बोलले एक्स्ट्रा सर्व्हिसचं बोलणं झालं स्पा मध्येच कसं आलं? तो म्हणाला अडाणीसारखं वागू नको, गेस्ट पाहत आहेत. पुष्प - तू स्पाबद्दल बोलली होतीस का?अंकिता - अंकितने सांगितले मी हे तू कर असं बोललो नाही. जर तुझ्या ओळखीची कोणी मुलगी असेल तर सांगशील गेस्ट १० हजार रुपये देणार आहे. पुष्प - त्यांना सांग, मी चांगल्या घरची आहे, अशी सर्व्हिस देऊ शकत नाही. अंकिता - हा, मी बोलले त्याला, मी गरीब आहे म्हणून १० हजारात विकली जाईल हे तुला वाटलं. मला समजलं होतं. दुसरी मुलीबाबत बोलले कारण कदाचित १० हजारांच्या लालसेपोटी मी मान्य करेन असा विचार त्यांना आला. यापुढे काही बोलला तर इथे काम करणार नाही.
अंकिता तिचा मित्र पुष्पसोबत रोज संध्याकाळी बोलायची. १८ सप्टेंबरला संध्याकाळी ८ वाजता अंकिताचा फोन लागला नाही. त्यामुळे पुष्पला संशय आला. त्याने रिसोर्ट मालक पुलकितला कॉल केला परंतु अंकिता तिच्या रुममध्ये झोपलीय असं उत्तर आले. दुसऱ्यादिवशी पुलकितचा मोबाईल स्विचऑफ होता. त्यानंतर मित्र जम्मूहून ऋषिकेशला पोहचला. अंकितानं अखेरचा कॉल हॉटेल स्टाफला केला होता. अंकिताने रडत तिची बॅग देण्यास सांगितले होते. अखेरचे चॅट, कॉल आणि रिसोर्टमधील सीसीटीव्ही फुटेजने मालक पुलकितचं रहस्य उघड केले आहे. ऋषिकेशच्या रस्त्यावर लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळालं की, रिसोर्टमधून ४ जण बाहेर गेले होते परंतु परतताना ३ जण आले.