VIP Thief Flight Robbery: एखाद्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये चोरी झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. क्वचित विमान प्रवासातही चोरी होऊ शकते हेदेखील लोक मान्य करू शकतात. पण एक चोर केवळ चोरीच्या उद्देशाने वर्षभरात तब्बल 200 वेळा विमान प्रवास करत होता असे सांगितले तर तुम्हालाही धक्काच बसेल ना.. दिल्ली पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे जो फक्त विमानात चोरी करायचा. चोरीच्या उद्देशाने तो विमानाने प्रवास करू लागला. यासाठी त्यांनी एका वर्षात 200 विमानांतून प्रवास केला. राजेश कपूर असे आरोपीचे नाव असून हा चोर फ्लाइटमध्ये वृद्ध लोकांचे दागिने चोरायचा. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि हिरे जप्त केले आहेत. या व्हीआयपी चोराचे दिल्लीतील पहाडगंजमध्ये स्वतःचे गेस्ट हाऊसही असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याने गेल्या एका वर्षात 110 दिवस 200 फ्लाईटमध्ये प्रवास करून चोरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूर्वी ट्रेनमध्ये दागिने चोरायचा, पण त्याने नंतर विमानात चोरी करायला सुरुवात केली. आयजीआय विमानतळाच्या डीसीपी उषा रंगराणी यांच्या म्हणण्यानुसार, हैदराबाद पोलिसांकडून चोरीचा एक झिरो एफआयआर प्राप्त झाला आहे. झिरो FIR हा कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये दाखल करता येतो.
तक्रार कुणी केली?
हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या सुधराणी पाथुरी या महिलेने तक्रारीत सांगितले की, 11 एप्रिल 2024 रोजी तिने हैदराबाद ते दिल्ली विमानतळापर्यंत एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास केला. या प्रवासादरम्यान कोणीतरी तिच्या बॅगमध्ये ठेवलेले सुमारे 7 लाख रुपयांचे दागिने चोरूले. आणखी एक तक्रारदार अमेरिकेतील रहिवासी वरिंदरजीत सिंग यांनी आरोप केला की, 22 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी अमृतसर ते दिल्ली विमानतळापर्यंत विमानाने प्रवास केला होता, तेव्हा त्यांच्या केबिन बॅगमधून 20 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले.
चोर कसा पकडला गेला?
प्रकरणाच्या तपासादरम्यान, एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने, दिल्ली विमानतळ, अमृतसर विमानतळ आणि हैदराबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात आले. शेकडो कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर, एका संशयिताला शॉर्टलिस्ट करण्यात आले कारण तो चोरीच्या दोन्ही फ्लाइटमध्ये दिसला होता. संबंधित विमान कंपनीकडून संशयित प्रवाशाचा फोन नंबर मिळवण्यात आला होता, मात्र त्याने बुकिंगच्या वेळी बनावट क्रमांक टाकून एअरलाइन्सची फसवणूक केली होती आणि हा क्रमांक दुसऱ्याच्या नावावर नोंदवला होता. तपासाअंती त्याचा खरा क्रमांक सापडला. संशयित हा पहाडगंज परिसरात राहत असल्याचे समोर आले. संशयिताचे छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळवण्यात आले आणि ते पहाडगंजच्या आसपासच्या भागातील लोकांना दाखवण्यात आले.
कुठे सापडला चोर?
आरोपी हा पहाडगंज येथील रिकी डिलक्स नावाच्या गेस्ट हाऊसच्या वरच्या मजल्यावर राहत होता. तो या गेस्टहाऊसचा मालक असल्याचेही समोर आले आहे. यानंतर आरोपीला पकडण्यात आले.