मुंबई - कलानगर आणि सायन ब्रिजवर गेल्या काही दिवसांपासून दोन तरुण येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाश्यांना हमारे गाडी का पेट्रोल खत्म हुवा हैं, दे शकते हो क्या नही तो १०० रुपये दो, हं आज जाके डालते हैं...! पैसे देदो हमें अभी...चाहिए तो हमारा, कल पैसे देते हैं हम आले आप कहा रेहते हो..! बतावणी करून कधी पैसे मागून तर कधी पेट्रोल घेऊन प्रवाश्यांना फसवत होते. याबाबत मेसेज व्हॉट्स अॅपवर वायरल झाला होता. या मेसेजसोबत दोन ठगांचे फोटो देखील वायरल करण्यात आले होते. त्यानुसार सायन पोलिसांनी दखल घेत मोहम्मद हाशिम अकबरअली शहा (३२) आणि मोहम्मद शाहिद अब्दुल वहाब चौधरी (३६) या दोन ठगांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
या प्रकरणाबाबत व्हॉट्स अॅपवर मेसेज आणि फोटो वायरल होताच, त्याची तात्काळ दखल घेत सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड आणि त्यांच्या पथकाने वायरल फोटोतील दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. कसोशीने शोध घेऊन अखेर पोलिसांना दोघे ठग सापडले. शहा हा धारावी येथील शेठवाडी, मुरुगन चाळीत राहणारा आहे तर दुसरा चौधरी हा मीरारोड येथे राहणारा आहे. या दोघांना सार्वजनिक सुव्यवस्था राखावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून पुन्हा अशा प्रकारे गैरप्रकार न करण्याबाबत कडक समज पोलिसांनी दिली आहे.