नवी दिल्ली - अलीगडमधील मदरशातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या मदरशामध्ये लहान मुलांना जाड लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मदरसाचे संचालक चिमुकल्यांकडे पैसे मागत असल्याचा देखील गंभीर आरोप लोकांकडून करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मदरशाचे मौलवी अतिशय कडक आणि क्रूर आहेत. ते अनेकदा मुलांना मारहाण देखील करतात. याच दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मदरशाच्या संचालकाला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीगडच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिरातील भुजपुरामध्ये एक मदरशा आहे. फहीमुद्दीन असं या मौलवीचं नाव असून मौलवी मुलांना मारहाण करतात. "आज जेव्हा मुलांच्या रडण्याचा, ओरडण्याचा खूप आवाज आला तेव्हा आम्ही मदरशामध्ये जाऊन पाहिलं. तिथे लहान मुलांना बांधून ठेवण्यात आलं होतं. आम्ही याला विरोध केला असता आम्हाला मारहाण करण्यात आली. यानंतर आम्ही याप्रकरणी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली आहे" अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मदरशाचा संचालक मुलांकडून पैसे मागतो
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार लहान मुलांचे हात जाड लोखंडी साखळीने बांधलेले आहेत. हा व्हिडrओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली. त्यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा एका मुलाला जाड लोखंडी साखळीने बांधलेलं त्यांना दिसलं. यानंतर पोलिसांनी या मदरशाचा संचालक फहीमुद्दीनला ताब्यात घेतलं आहे. स्थानिक लोकांनी याबाबतची तक्रार केली होती. स्थानिक लोकांच्या मते, या मदरशाचा संचालक मुलांकडून पैसे मागतो. आणखीही काही गंभीर आरोप स्थानिक लोकांनी मौलवीवर केले आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल
गंभीर आरोप असताना दुसरीकडे फहीमुद्दीनने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संपूर्ण प्रकरण एका भांडणामुळे झालं असल्याचं म्हटलं आहे. शेजाऱ्यांशी भांडण झालं आणि त्यानंतर ही तक्रार करण्यात आली. तसेच एका लहान मुलांना बांधून ठेवलं कारण ते पळून जातात असा देखील फहीमुद्दीनने दावा केला आहे. सीओ राघवेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरून हा व्हिडीओ मिळाला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. तसेच यामध्ये कोण आहेत याचा तपास सुरू आहे. यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.