नवी दिल्ली - हरियाणाच्या फरीबाद जिल्ह्यामध्ये स्वतःला भाजपा नेता (BJP) सांगणाऱ्या एका व्यक्तीची दादागिरी पाहायला मिळाली आहे. त्याने महिला अन् तिच्या मुलीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भाजपाचा नेता म्हणवणाऱ्या व्यक्तीवर महिलेला मारहाण आणि तिच्या मुलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि आयपीसी कलम 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अशोक गोयल असं या व्यक्तीच नाव असून हा व्यक्ती स्वतःला भाजपा नेता असल्याचं सांगतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तो महिलेला मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे एका महिलेसोबत संबंध आहेत. तसेच तिच्या मुलीवरही या व्यक्तीची वाईट नजर होती. जेव्हा या महिलेने या गोष्टीचा विरोध केला तेव्हा त्याने महिलेला मारहाण केली. याशिवाय आपले अनेक मोठ्या नेत्यांसोबत संबंध असल्याचं सांगत फरीदाबादमध्ये कोणीही त्याचं बिघडवू शकत नाही,असंही त्यानं म्हटलं. महिलेच्या तक्रारीनंतर आता या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिला अशोक गोयलकडे काम करते. हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून महिला आणि तिच्या मुलीसोबत छेडछाड करायचा. याच कारणामुळे महिलेच्या मुलीने ब्लेडनं आपली नस कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. आरोपी अशोक तिला इतर लोकांसोबतही संबंध ठेवण्यास सांगायचा. महिलेच्या मुलीने सांगितलं की आरोपी तिच्यासोबत आरोपी छेडछाड करायचा आणि नकार दिल्यास लाकडाने तसेच काठ्यांनी मारहाण करायचा. मोठमोठ्या नेत्यांसोबत ओळख आहे. फरीदाबादमध्ये कोणीच त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही असं म्हणत सतत धमकी देत असे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपाचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर (Kaushal Kishore) यांच्या सुनेने आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदारांची सून अंकिता यांनी खासदारांच्या घराबाहेर आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने अंकिता यांना रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येआधी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी "मी जीव द्यायला जातेय" असं म्हटलं आहे.
अंकिता यांनी आपले पती आयुष यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्हिडीओमध्ये अंकिताने आपण आत्महत्या करायला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्या आपल्या स्कूटीने खासदारांच्या दुबग्गा येथील घरी पोहोचल्या. तिथे त्यांनी आपल्या हाताची नस कापून घेतल्याचं म्हटलं जात आहे. "मी कोणासोबत लढू शकत नाही कारण तुमचे वडील हे खासदार आहे. माझं कोणीच ऐकणार नाही. आजपर्यंत कोणीच तुम्हाला हात लावला नाही. मग मी कशी तुम्हाला मारू शकते" असं अंकिता यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.