नालासोपारा : कोविडच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करणाऱ्या विरार पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी रात्री शिवीगाळ करून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विरार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जगदीश मराठे (४०) आणि पोलीस अंमलदार रवी वानखेडे हे दोघेही पेट्रोलिंग करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता दुचाकीवरून निघाले. फुलपाड्याच्या रामचंद्रनगर येथील पाठीमागील गल्लीमध्ये सहा ते सात जण विनामास्क एकमेकांशी हुज्जत घालताना दिसले.
दोन्ही पोलिसांनी त्यांना हटकले. तर, एका आरोपीने हुज्जत घालून पोलिसांना निघून जाण्यास सांगून शिवीगाळ करत मराठे यांची कॉलर पकडली. वानखेडे यांनी त्याला विरोध केल्यावर तीन आरोपींनी उलट त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. मराठे यांच्या कानामागे लोखंडी वस्तूने मारहाण करून दुखापत केली. मराठे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.