लखनौ : लखनौमध्ये एका तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनास्थळी एक सुसाइड नोट मिळाली असून यामध्ये या तरुणाने लखनौमध्ये तैनात असलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, केसमध्ये अडकवून त्याला तुरूंगात पाठवण्याचाही आरोप या तरुणाने केला आहे. दरम्यान, सुसाइड नोट मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी मृत तरुणाने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. (Uttar Pradesh: Youth commits suicide, blames Lucknow DCP for framing him in sex racket case)
हसनगंजच्या विवेकानंद हॉस्पिटल रेल्वे क्रॉसिंगच्याजवळ एका तरुणाने पोलिसांना फोन केल्यानंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. विशाल सैनी असे या तरुणाचे नाव असून तो सचिवालयात कॅम्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. तसेच, रविदास मंदिराजवळ राहत होता. त्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये नॉर्थ झोनमध्ये तैनात आयपीएस अधिकारी प्राची सिंह यांच्यावर खोट्या प्रकरणात तुरुंगात पाठवण्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, १३ फेब्रुवारीला आयपीएस अधिकारी प्राची सिंह यांनी इंदिरा नगरमध्ये स्टाइल इन दी ब्युटी सलून आणि स्पा सेंटरवर धाड टाकली होती. त्यावेळी पाच महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यासोबत मृत विशाल सैनीलाही अटक करण्यात आली होती. मात्र, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याला मानसिक त्रास झाल्याचे सांगण्यात येते.
विशाल सैनी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, 'मी आत्महत्या करीत आहे, यासाठी जबाबदार आयपीएस प्राची सिंह आहेत, त्यांनी माझे करिअर खराब केले आहे आणि मी समाजात आणि कुटुंबीयांच्या नजरेसमोर उभा राहू शकत नाही. त्याचा मला त्रास होत आहे. तसेच, निरपराध लोकांना तुरूंगात पाठवू नये, असेही त्याने म्हटले आहे. याचबरोबर, 'आयपीएस प्राची सिंह यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, पदोन्नतीच्यावेळी अनेक निरपराध लोकांना शिक्षा केली, मी निर्दोष होतो, माझी प्राची सिंह यांनी सेक्स रॅकेटमध्ये फसवणूक केली',असेही सुसाइड नोटमध्ये त्याने म्हटले आहे.
याप्रकरणी विशाल सैनीकडून करण्यात आलेले आरोप निराधार आहेत, असे पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी म्हटले आहे. १३ फेब्रुवारीपासून आत्महत्या केलेल्या दिवसापर्यंत विशाल सैनीकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार आली नाही. या प्रकरणात पोलिसांनी त्यांचे काम केले होते. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी म्हटले आहे.