वाराणसी – अयोध्येबाबत नेपाळ पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलेल्या विधानावरुन भारतात काही संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. ओली यांच्याविरोधात विश्व हिंदू सेनेने एका युवकाचं मुंडन करुन केलं होतं. हा नेपाळी युवक होता असं सांगितलं तसेच मुंडन केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर जय श्रीराम लिहिण्यात आलं हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करण्यात आला.
हा व्हायरल व्हिडीओ गंगा किनाऱ्यावरील घाटावर बनवण्यात आला होता. नेपाळी पंतप्रधान ओली यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू सेनेने हे आंदोलन केले होते, त्याचसोबत वाराणसीत पोस्टर्सबाजी करण्यात आली होती. यात नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी माफी न मागितल्यास भारतात राहणाऱ्या नेपाळींना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित घटनेबाबत पोलिसांनी तपास सुरु केला. यात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
वाराणसी पोलिसांच्या माहितीनुसार ज्या युवकाचं मुंडन करण्यात आलं होतं, तो नेपाळी नव्हे तर भारतीयच आहे, त्याचा जन्म वाराणसीत झाला आहे. त्याचे आधारकार्ड, मतदान कार्ड तपासले. आंदोलनकर्त्यांना तो पहिल्यापासून ओळखत होता. युवकाचे मुंडन करण्यासाठी त्याला १ हजार रुपये देण्यात आले होते, पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या युवकाचा पोलिसांनी शोध घेतला, तो वाराणसीत जल संस्थान सरकारी कॉलनीत राहत होता. युवकाचे आईवडील दोघंही सरकारी नोकरीत आहेत. ज्या आंदोलनकर्त्यांनी युवकाचे मुंडन केले ते एकमेकांना आधीपासून ओळखत होते. व्हिडीओ बनवण्यासाठी युवकाला १ हजार रुपये देण्यात आले होते.
१६ जुलै रोजी अरुण पाठक नावाच्या व्यक्तीने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओबाबत भेलूपुरमध्ये गुन्हा नोंद झाला, व्हिडीओत शेजारील राष्ट्रातील व्यक्ती आणि राजकीय नेत्यांबद्दल अश्लिल शब्दात वादग्रस्त विधानं करण्यात आली होती. वाराणसी पोलिसांनी शुक्रवारी ४ जणांना आणि शनिवारी दोघांना अटक केली. यात संतोष पांडे, आशिष मिश्रा, राजू यादव, अमित दुबे, राजेश राजभर, जय गणेश शर्मा यांना अटक केली आहे तर विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष आणि मुख्य आरोपी अरुण पाठक यांना अद्याप अटक झाली नाही.