राकेश घानोडे, नागपूर: स्वत:चा मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगी व सासू यांची क्रूरपणे हत्या करणारा विवेक गुलाब पालटकर (४०) याची मरेपर्यंत फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली. न्यायमूर्ति विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली होती.
कृष्णा विवेक पालटकर (५), अर्चना कमलाकर पवनकर (४५), कमलाकर मोतीराम पवनकर (४८), वेदांती कमलाकर पवनकर (१२) व मीराबाई पवनकर (७३) अशी मृतांची नावे आहेत. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. १५ एप्रिल २०२३ रोजी सत्र न्यायालयाने पालटकरला भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत मरेपर्यंत फाशी व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा खटला उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तसेच, पालटकरने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. त्यावर १८ डिसेंबर २०२३ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर निर्णय राखिव ठेवण्यात आला होता. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून पालटकरचे अपील फेटाळून लावले. सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे तर, फिर्यादी केशव पवनकरतर्फे ॲड. मो. अतिक यांनी कामकाज पाहिले.------------------अशी घडली घटनाक्रूरकर्मा पालटकरला पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर हे पालटकरला पैसे परत मागत होते. पालटकर त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या आठ दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे पालटकरने कमलाकर व इतरांना कायमचे संपविण्याचा कट आखला. त्यानुसार, तो ११ जून २०१८ रोजी रात्री दहाच्या सुमारास कमलाकर यांच्या घरी गेला. दरम्यान, सर्वांनी सोबत भोजन केले. त्यानंतर घराच्या हॉलमध्ये पालटकर व मीराबाई झोपल्या. बेडरुममध्ये कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा झोपले. पालटकरची मुलगी वैष्णवी (१२) व कमलाकर यांची मुलगी मिताली (१४) दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. मध्यरात्री एकच्या सुमारास पालटकर जागा झाला. त्याने सैतानासारखे कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा यांच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने जबर वार केला. त्यामुळे चौघेही बेडवरच ठार झाले. त्यांचा आवाज ऐकून मीराबाई बेडरुमकडे धावल्या असता पालटकरने त्यांना पकडून स्वयंपाकघरात नेले व त्यांनाही डोक्यावर वार करून ठार मारले. त्यानंतर तो लोखंडी गेटवरून खाली उडी मारून पसार झाला. वैष्णवी व मिताली सुदैवाने बचावल्या.