वाडा : वाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बनावट नोटांचा छापखान्याबाबत वाडा पोलिसांना काहीही माहिती नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, अनधिकृत धंद्यांबाबत वाडा पोलीस अनभिज्ञ असल्याचे दिसून येते आहे. विशेष म्हणजे वाडा पोलिसांचा गोपनीय विभाग किती दक्ष आहे हे यावरून दिसून येत आहे.
वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अनधिकृत धंद्यांना उधाण आले आहे. गाड्यांमधून लोखंड उतरवण्याचा गोरखधंदा, मटका, जुगार, भंगार, दमणची दारू येथे आणून राजरोसपणे विकली जात आहे. असे अनेक धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिसांना याबाबत काहीही माहिती नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गाड्यांमधून स्टील उतरवून त्याची लगेच विल्हेवाट लावली जाते.
तालुक्यातील काही तरुण दमणची दारू आणून येथे राजरोसपणे विकत आहेत. विशेष म्हणजे बीअर बारलासुद्धा ही दारू पुरवली जात आहे. तालुक्यात अनेक भंगारची दुकाने सुरू असून हे धंदेवाले चोरट्या लोखंडी वस्तू राजरोसपणे घेत आहेत. वाडा शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी मटका जुगाराचा अड्डा आहे. या सर्वच बाबतींत पोलीस अनभिज्ञ आहेत. दरम्यान, अनधिकृत धंद्यांबाबत पोलीस डोळेझाक तर करीत नाहीत ना, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
खासदार गावितांनी पोलिसांना खडसावलेवाड्यात बनावट नोटांचा छापखाना मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल्याने वाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे गुरुवारी वाड्यात आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीत गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी तुकाराम पाटील यांना खासदारांनी चांगलेच खडसावले. मुंबई पोलीस वाड्यात येऊन छापे मारून बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आणत आहेत. मग, वाडा पोलीस काय करीत आहेत? ही तुमची जबाबदारी नाही का? पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये काय करीत आहेत? अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना खडसावले.