पाचवड : सातारा येथून बेपत्ता असलेल्या विवाहितेच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला भुइंज पोलिसांनी बेळगावमध्ये बेड्या ठोकल्या. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने २०१९ मध्ये पत्नीचाही खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. या कबुलीमुळे पोलिसांबरोबरच वाई तालुका पुन्हा हादरला आहे. यामुळे सर्वांना वाई येथील संतोष पोळ हत्याकांडाची आठवण झाली. २०१९ मध्ये खून करून पुरलेला मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे. नितीन आनंदराव गोळे (वय ३८), असे अटक केेलेल्या व्यक्तीचे नाव असून, मनीषा नितीन गोळे (३४, रा. व्याजवाडी, ता. वाई) व संध्या विजय शिंदे (३४, रा. कारी, ता.जि. सातारा), अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत.
पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, कारी (ता. सातारा) येथील संध्या विजय शिंदे या ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून बेपत्ता झाल्या होत्या. याची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, मंगळवार, दि. ३ रोजी सायंकाळी पाच वाजता भुइंज पोलीस ठाणे हद्दीतील आसले येथील उसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधार कार्ड व इतर कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर संबंधित मृतदेह संध्या शिंदे हिचा असल्याची खात्री झाली. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून हा खूनच असावा, असा प्राथमिक अंदाज बांधून सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी तपासाला सुरुवात केली. भुइंज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते.
दरम्यान, कारी येथे बुधवार, दि.४ रोजी सकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाइकांनी भुइंज पोलीस ठाण्यात येऊन संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे यानेच केला असल्याची फिर्याद दिली. यावरून भुइंज पोलिसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले; परंतु तो सापडत नव्हता. मोबाइल लोकेशनच्या आधारावर संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथके रवाना केली. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे यांच्या पथकाने वैराटगड पायथ्याशी असलेल्या डोंगरदऱ्यात रात्रंदिवस फिरून नितीन गोळेचा शोध घेतला. मात्र, अपयश आले होते. पोलिसांना गुंगारा देऊन नितीन गोळे बेळगाव परिसरात पसार झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना मिळाली. त्यांनी स्वतः सहकाऱ्यांसोबत बेळगाव येथे सापळा रचून मंगळवार, दि.१० रोजी सायंकाळी पाच वाजता अटक केली.
त्याला भुइंज पोलीस ठाण्यात आणून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता दोन महिलांचा खून केल्याची कबुली दिली. संध्या शिंदे यांच्याबरोबरच पत्नी मनीषा नितीन गोळे यांचा १ मे २०१९ रोजी खून करून त्यांचाही मृतदेह वैराटगडाच्या पायथ्याशी पुरल्याची कबुली भुइंज पोलिसांना दिली आहे, अशी माहिती भुइंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नितीन गोळे याला गुरुवारी वाईच्या न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वत:च दिली पत्नी हरविल्याची नोंद
नितीन गोळे याने पत्नी मनीषा हिचा १ मे २०१९ रोजी खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून स्वतःच पत्नी हरविली असल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. तिचा मृतदेह वैराटगडाच्या पायथ्याला पुरून टाकल्याची, तसेच संध्या शिंदे हिचा गळा आवळून खून केल्याचीही कबुली नितीनने भुइंज पोलिसांना दिली. त्यानंतर नितीनने पुरलेला मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी खोदकाम सुरू केले.