नालासोपारा (मंगेश कराळे) :- २० वर्षीय मुलाने दुचाकी रिपेरिंग करण्यासाठी ३० हजार रुपये पाहिजे असल्याने स्वतःच्या अपहरणाचा केलेला खोटा बनाव वालीव पोलिसांनी उधळला आहे. वालीव पोलिसांनी दोन तासात हा बनाव उधळून मुलाला वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
फादरवाडीच्या शांतीनगर परिसरात राहणाऱ्या अंकितकुमार नन्हेलाल यादव (२०) याने त्याच्या दुचाकी रिपेरिंग करण्यासाठी ३० हजार रुपयांची गरज असल्याने ७ डिसेंबरला अपहरण झाल्याचे दाखवले. अंकितच्या वडिलांनी ७ डिसेंबरला रात्री वालीव पोलीस ठाण्यात जाऊन हकीकत सांगितल्यावर पोलिसांनी मिसिंगची तक्रार घेतली. ८ डिसेंबरला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अंकितने त्याच्या काकाला फोन करून माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे व्हॉट्सऍपवर जे स्कॅनर पाठवला आहे त्यावर ३० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना ही माहिती मिळाल्यावर तात्काळ गांभीर्य लक्षात घेऊन ४ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पथके नेमून तपासाला सुरुवात केली. अंकीतने काकाच्या मोबाईलवर पाठविलेल्या स्कॅनरचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाल्यावर वसई फाटा येथील एका दुकानाचे स्कॅनर असल्याची उपयुक्त माहिती मिळाली. त्या ठिकाणी वालीव पोलिसांच्या एका टीमने सापळा रचल्यावर अंकित त्याठिकाणी आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्याची चौकशी केल्यावर हा बनाव केल्याचे कबूल केले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, रंजित नलावडे, गुरुदास मोरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, रुस्तम राठोड, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी पार पाडली आहे.