मुंबई : दादरमधील एका नामांकित बारच्या टॉयलेटमध्ये मित्रासोबत गेल्याने बारच्या वेटरने हटकल्याचा राग आल्याने महिलेने वेटरसह मॅनेजरला शिवीगाळ करत बारमध्येच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महिलेला समजावण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसांनाही केस ओढून बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका महिला उपनिरीक्षकाचा दात तुटला आहे.
याप्रकरणी दादर पोलिसांनी बदलापूरच्या क्षितिजा शिरोडकर (२५) या महिलेला अटक केली आहे. ती एका नामांकित बँकेत मॅनेजर पदावर काम करते. दादर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गौरी दाते (३८) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्या निर्भया अधिकारी आहेत.
बुधवारी दादर परिसरात कर्तव्यावर असताना, सायंकाळी ७ च्या सुमारास एका बारमध्ये भांडण सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, दाते पथकासह हॉटेलमध्ये गेल्या. तेव्हा, एक महिला आणि पुरुष वाद घालताना दिसून आले. चौकशीत दोघेही एकत्र बाथरूममध्ये जात असल्याने वेटरने त्यांना हटकले. रागात तिने वाद घालण्यास सुरुवात केल्याचे समजले.
‘त्यात काय चूक?’पोलिसांनी महिलेकडे विचारणा करताच तिने दारूच्या नशेत, पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ करत माझी पोलिस आयुक्तांपर्यंत ओळख आहे. सीपीना कॉल लावते. तुमची नोकरी घालवते म्हणत, शिवीगाळ सुरु केली. तिला गाडीत बसवले. ती पुन्हा खाली उतरली. माझ्या मित्रासोबत बाथरूमला गेली त्यात काय चूक असे बोलून तिचा गोंधळ सुरूच होता.
क्षितिजाला पोलिस ठाण्यात येण्यास सांगताच तिने दाते यांची कॉलर पकडून केस पकडले. तेवढ्यात तिने डोक्याने त्यांच्या तोंडावर मारले. त्यात, महिला पोलिसाचा दात तुटला. गोंधळी महिलेला आवरण्याचा प्रयत्न करताच तिने आणखी मारहाण केली. महिला पोलिसाने मदतीसाठी ओरड करताच, एका सहकारी महिलेने पुढाकार घेतला महिलेने त्यांनाही धक्काबुकी केली. अखेर, दोघांनी मिळून क्षितिजाला गाडीत बसवले. गाडीतही तिने मारहाण केली. वैद्यकीय तपासणीच्या वेळेसही तिने गोंधळ घातला.