पुणे : आंबेगाव बुद्रुक येथे सीमाभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील स्थापत्य अभियंत्याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळून लावला आहे.लिंगराज चंद्रकांत बिराजदार (44, रा. हायवे रेसिडेन्सीच्या समोर, वडगाव बु. मुळ गाव रा. अक्कलकोट, सोलापूर) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. बिराजदार याला 9 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सीमाभिंतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबतचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाने दिला आहे. बिराजदार याचा गुन्हयात प्रत्यक्ष संबंध असल्याचेही समोर आले आहे. बिराजदार सिव्हील इंजिनिअर असून त्याची एका शिक्षण संस्थेनी नेमणूक केली आहे. भिंतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असताना देखील बिराजदार याने भिंतीचे बिल सर्टिफाईड करून रक्कम दिली आहे. आंबेगाव बुद्रुक येथे सर्व्हे क्रमांक 10/10 येथे सखाराम गणपत कोंढरे यांच्या 19 गुंठे जागेत बिल्डर दांगट यांच्याकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेजारी मोकळ्या जागेत मजुरांना राहण्यासाठी सीमाभिंतीलगत सहा ते सात झोपड्या आहेत. त्यामध्ये 16 कामगार राहत होते. या झोपड्यांवर सीमाभिंत कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार 1 जुलै रोजी घडला. बांधलेल्या भिंत धोकादायक आहे का नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी बिराजदार याची होती. धोकादायक भिंत कोसळून प्राणांतीक धोका निर्माण होऊ शकतो याचीही जाणीव त्याला होती. त्याला जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल चिविड शेट्टी हे करित आहेत.
पुण्यातील आंबेगाव बुदुक येथील भिंत दुर्घटनाप्रकरणी अभियंत्याचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 7:48 PM