मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख सीबीआयने याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला आहे. तसेच, २५ कोटी रुपयांचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रुपये या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले, असे सीबीआयने नमूद केले आहे.
याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वानखेडे यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. २ ऑक्टोबर रोजी कॉर्डिलिया क्रूझवर झालेल्या छापेमारीदरम्यान २७ लोकांची नावे पुढे येऊनही त्यातील केवळ १० जणांनाच अटक करण्यात आली. तसेच, याप्रकरणी पंचनामा करण्यासाठी किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांना छापेमारीच्या कारवाईत सहभागी करून घेतले. एवढेच नव्हे, तर छापेमारीनंतर आरोपींना किरण गोसावी याच्या गाडीतून एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. गोसावी हा एनसीबीचाच अधिकारी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याखेरीज, छापेमारीनंतर गोसावी याला एनसीबीच्या कार्यालयात मुक्तप्रवेश होता. तिथे त्याने आर्यन खान याच्यासोबत सेल्फी काढले, व्हॉइस नोट रेकॉर्ड केल्या. छापेमारीनंतर खासगी पंचाला संबंधित कार्यालयात प्रवेश देणे हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
समीर वानखेडे यांच्यावरील आरोप- आर्यन खानला या प्रकरणात न गोवण्यासाठी २५ कोटी मागणे.- छापेमारीदरम्यान २७ लोकांची नावे पुढे आली होती. मात्र, केवळ १७ लोकांना कोणत्याही लेखी नोंदीशिवाय सोडून दिले.- १० जणांनाच अटक केली.- अरबाज मर्चंट याला अमली पदार्थ दिल्याचा आरोप असलेल्या सिद्धार्थ शहा या व्यक्तीलादेखील कोणत्याही तपासणी व चौकशीशिवाय तेथून जाऊ दिले.- वानखेडे हे विरल रंजन नावाच्या एका व्यक्तीसोबत महागड्या घड्याळ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. याची कोणतीही माहिती त्यांनी सरकारला किंवा त्यांच्या विभागाला दिली नाही.- वानखेडे यांच्या परदेशी प्रवासाचा हेतू त्यांनी नीट सांगितला नाही.- परदेशी प्रवास खर्चात तपशीलदेखील चुकीच्या पद्धतीने सादर केला.
तक्रार कशी झाली? -- कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीनंतर वानखेडे व त्यांच्या पथकावर आरोप झाले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी एका विशेष चौकशी पथकाची स्थापना केली होती. - या चौकशी समितीच्या पडताळणीत समोर आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने एनसीबीच्या दक्षता पथकाचे अधीक्षक कपिल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर ११ मे २०२३ रोजी वानखेडे व त्यांच्या पथकाची चौकशी करण्याची लेखी विनंती सीबीआयला केली.