मुंबई - एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या अडचणीत वाढ वाढ झाली असून त्यांनी 'आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू' हे केलेले चिथावणीखोर वक्तव्या त्यांना डोईजड होण्याची चिन्ह दिसत आहेत. पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात संघर्ष या सामाजिक संस्थेने लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच लेखी तक्रार संघर्ष या सामाजिक संस्थेचे पृथ्वीराज म्हस्के यांनी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), झोनचे १० चे पोलीस उपायुक्त यांना देखील देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारं विधान केलं आहे. आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू, असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. यावरून संपूर्ण भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच हिंदू संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. भायखळ्याचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केलं. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं होतं.