यवतमाळ: अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे सोमवारी सायंकाळी मायलेकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. त्या मायलेकांनी दोन महिन्यांपूर्वीच आर्णी तालुक्यातील वरूड (भक्त) हे गाव सोडले होेते, असे त्या विवाहितेच्या पतीने सांगितले.
वरूड (भक्त) येथील माधुरी गजानन शिंगणजुडे (३५) व तिचा दिव्यांग मुलगा ऋषीकेश (१०) या दोघांचे मृतदेह चांदूरबाजार येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. माधुरीचा विवाह वरूड (भक्त) येथील गजानन शिंगणजुडे यांच्याशी दोन वर्षांपूर्वीच झाला होता. माधुरीला त्यापूर्वीच पहिल्या पतीकडून ऋषीकेश हा दिव्यांग मुलगा होता.
पतीसोबत तिचे नेहमी खटके उडत होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी माधुरीने तिची बहीण व इतर नातेवाईकांना वरूड (भक्त) येथे बोलावले होते. तेथे त्यांची बैठक झाली. या बैठकीतच माधुरीने वरूडसोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती मुलगा ऋषीकेशसह वरूड येथून निघून गेली. तेव्हापासून तिच्याशी आपला संपर्क नाही, असे तिचा पती गजानन शिंगणजुडे यांनी सांगितले.
तब्बल दोन महिन्यानंतर सोमवारी सायंकाळी माधुरी व ऋषीकेशचा मृतदेहच चांदूरबाजार येथे आढळून आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. ही हत्त्या की आत्महत्या, असा संभ्रम निर्माण झाला. चांदूरबाजार पोलिसांनी दोन्ही दिशेने तपास सुरू केला. मात्र, माधुरीनेच प्रथम ऋषीकेशची हत्त्या करून नंतर आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे.
पतीच्या माहितीला माजी सरपंचाचा दुजोरा
मृतक माधुरी मुलासह पती गजाननला सोडून दोन महिन्यांपूर्वीच वरूड येथून निघून गेली होती, या माहितीला वरूडचे माजी सरपंच सुरेश काळे यांनीही दुजोरा दिला. गजानन सायकलवर स्टेशनरीचा फिरता व्यवसाय करून कुटुंब चालवितो, असेही त्यांनी स्पष्ट केले.