चाकूर ( जि. लातूर) : भररस्त्यावर दुचाकी आडवी लावून दुचाकीस्वाराला थांबवून दुचाकी, पैशाची बॅग पळविल्याची घटना घडली. दरम्यान, पळवलेल्या दुचाकीचा शोध घेत संशयिताला पकडून आणताना पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवाय, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, बालाजी लक्ष्मण कराळे (रा. शिरूर दबडे) हे दुचाकीवरून गावाकडे जात होते. दरम्यान, नांदगाव पाटीनजीक रस्त्यावर त्यांची दुचाकी आडवून कराळे यांची दुचाकी आणि पैशाची बॅग सेवापूर तांडा येथील रामलाल देवीदास राठोड यांनी हिसकावून पळ काढला. या घटनेचा माहिती कराळे यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. घाडगे यांच्यासह पोलिसांचे पथक तपासासाठी सेवापूर तांडा येथे गेले. त्यावेळी रामलाल राठोड यांच्या घरासमोर घटनेतील दुचाकी आढळून आली. पोलीस पथकाने चौकशीसाठी रामलाल राठोड आणि रामदास राठोड यांना पोलीस ठाण्याकडे आणत असताना पांडुरंग राठोड, माया राठोड, दिनेश चव्हाण, बालाजी राठोड, रफिक शेख आणि इतर सहा अशा एकूण तेरा जणांनी तेथे येऊन पोलीस पथकाशी वादावादी घातली. हातात काठ्या घेऊन तुम्ही त्यांना कसे घेऊन जाता, असे म्हणून फिर्यादी बालाजी कराळे यांना पोलीस पथकासमोर मारहाण केली. यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करून संशयितांना घेऊन जाण्यास विरोध केला. दरम्यान, याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रघुत्तमराव मोरे यांच्या फिर्यादीवरून तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.