मुंबई - नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) गेल्या शुक्रवारी कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यभरात सनातन संस्थेशी संबंधीत वैभवसोबत काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी वैभव राऊतला न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वैभव राऊतवर करण्यात आलेली कारवाई संशयास्पद असल्याबद्दल चर्चा होत आहे. मात्र, आज दुपारी ३ वाजता एटीएसने अचानक एसआरपी व लोकल पोलिसांना सोबत घेत वैभवला त्याच्या भंडारआळीतील त्याच्या निवासस्थानी पुन्हा चौकशीसाठी आणले होते.यावेळी साधारण ५० मिनीटे त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी त्याची इंनोवा गाडी (एमएच ४८, एके २६२६) जप्त केली. त्यावेळी वैभवला त्याच्या कुटुंबियांसोबत बातचीत करण्यास दिली. मात्र, वैभवला आज का व कशासाठी घेऊन आले होते कळले नाही असे वैभवाची पत्नी लक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी गाडीचे इन्शुरन्स पेपर सोबत घेऊन गेले. वैभवशी आम्हाला व्यवस्थितपणे बोलूही दिले नाही असा आरोप लक्ष्मी यांनी केला आहे. गोरक्ष संरक्षक असलेला वैभव राऊत याचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे तसेच त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याच्या संशयावरून त्याच्या नालासोपारा येथील भंडारआळीतील निवासस्थानी एटीएसने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. मात्र, आज दुपारी पुन्हा ३ वाजता एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभवला त्याच्या घरी तोंडावर बुरखा घालून चौकशीसाठी आणले होते. यावेळी परिसरात एसआरपी व लोकल पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.वैभव राऊतला बुधवारी दुपारी ३ वाजता चौकशीसाठी त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्याच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये जवळपास ५० मिनिटे त्याची चौकशी करण्यात आली. वैभवला घरी आणल्याची बातमी वाऱ्यासारखी नालासोपारा व वसई-विरार शहरात पसरली. काही वेळातच हजारोंच्या संख्येने गावकऱ्यांनी वैभवच्या घराबाहेर गर्दी केली होती. ३ वाजून ५० मिनीटांनी वैभवला बुरखा घालून पोलीसांनी त्याला घराबाहेर आणले. यावेळी उपस्थित लोकांनी वैभवचा बुरखा काढा.आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे. असा आग्रह केला. बुरख्याआड वैभव नाही असा संशयही काही जणांनी व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत वैभवला घराजवळील चिंचोळ्या गल्लीतून घरामागील पोलीसांच्या गाडीत नेऊन बसवले. त्यानंतर काही वेळातच एटीएस, पोलीस व एसआरपी वैभवला घेऊन निघून गेले.
आम्हाला वैभवशी व्यवस्थित बोलूच दिले नाही; वैभव राऊत यांचा पत्नीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 9:16 PM