गंगाखेड (परभणी ) : फायनान्सची हप्ते थकीत असल्यास त्याच्या वसुलीसाठी दुचाकी वाहने उचलत असे, याच अनुभवातून दुचाकी चोरण्याचे डोक्यात आले अशी कबुली गंगाखेड पोलिसांना चोरट्याने दिली. त्याच्याकडून पोलीसांनी पंधरा दुचाकी जप्त केल्या.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून पासून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची चोरी होत होती. ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होवुन सुद्धा तपास लागत नसल्याने पोलीस हतबल झाले होते. दुचाकी चोराचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी आपल्या खबरींना जागोजागी कामाला लावल्यानंतर दि. ११ जुन १८ रोजी गंगाखेड बस स्थानक परिसरातील हॉटेल समोरुन दुचाकी चोरणारा चोरटा दि. २ जुलै रोजी शहरात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडुन पोलिसांना मिळाली.
यावरून डी.वाय.एस.पी. सुधाकर रेड्डी, पोलीस निरीक्षक सोहन माछरे, सपोनि सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील प्रकाश रेवले, तपासीक अंमलदार रंगनाथ देवकर, पो.शि. शेख जिलानी, सुग्रीव कांदे, माणिक वाघ, योगेश गयाळ, श्रीकृष्ण तंबुड, नरसिंग शेल्लाळे, रवि कटारे आदींनी सापळा रचुन गोविंद वैजनाथ घुले( २०, रा. शेंडगा ता.गंगाखेड) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली तेंव्हा त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
रिकव्हरीच्या अनुभवातून चोरी
पोलीस कोठडीत त्याने आपण पूर्वी फायनान्स कंपनी मध्ये हप्ते थकीत राहिलेल्या दुचाकी उचलुन आणण्याचे काम करत होतो. हे काम बंद झाल्याने व आर्थिक चणचण भासू लागली. यामुळे तीन साथीदारांसोबत मिळुन या अनुभवाच्या आधारे विविध ठिकाणाहून दुचाकी चोरल्या अशी कबुली आरोपी गोविंद याने दिली. त्याच्याकडून चोरी केलेल्या पंधरा दुचाकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत.