नागपूर - मोबाईलवरून चिथावणीचे मेसेज केल्याच्या आरोपावरून यवतमाळ जिल्ह्यातील एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी रात्री अटक केली. अद्याप याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
रमेश नामक हा तरुण यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी येथील रहिवासी आहे. त्याच्या मोबाईलवरून चिथावणीचे तसेच अश्लिल मेसेज व्हायरल झाले. लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला काही तासांचा कालावधी शिल्लक असताना पाठविण्यात आलेल्या या मेसेजमुळे अफवा पसरू शकतात, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. मेसेजची माहिती कळताच एटीएसच्या पथकाने मंगळवारी रात्री झरी जामणी गाठून रमेशला ताब्यात घेतले. त्याची रात्रीपासून कसून चौकशी केली जात आहे. त्याची एकूणच परिस्थिती आणि संपर्क लक्षात घेता हा खोडसाळपणा दुसऱ्याच कुणी केला असावा, असा अंदाज संबंधित अधिका-यांनी काढला. अंतिम निष्कर्ष काढण्यात आला नाही मात्र आतापर्यंतच्या चौकशीत चिंता करण्यासारखा प्रकार नसल्याचे एटीएसच्या सूत्रांनी लोकमतशी बोलतना सांगितले.