आटपाडी : आटपाडी व मासाळवाडी येथे खासदार संजयकाका पाटील व आमदारगोपीचंद पडळकर यांच्या गटात मंगळवारी जोरदार मारामारी झाली. दोघेही नेते भाजपाचे आहेत हे विशेष. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची वाहने फोडण्यात आली. याप्रकरणी पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि मुंबईतील आयकर विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह १२ जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ब्रम्हानंद पुंडलिक पडळकर (रा. झरे), गणेश भुते (रा. भिंगेवाडी), नवनाथ मारुती सरगर (रा. झरे), अनिल सूर्यवंशी (रा. गोदिरा), विठ्ठ्ल पाटील (रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), पैलवान सत्यजित पाटील (रा. विटा) या आमदारगोपीचंद पडळकर समर्थकांवर, तर डॉ. सचिन बीरा मोटे (रा. विभूतवाडी), विनायक ऊर्फ बापूराव मारुती मासाळ, राहुल मारुती मासाळ (दोघेही रा. मासाळवाडी), अक्षय सुदाम अर्जुन (रा. अर्जुनवाडी), राजू पांडुरंग अर्जुन (रा. झरे), नारायण पांडुरंग खरजे (रा. विभुतवाडी) या खासदार पाटील यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे.शांताबाई मारुती मासाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मासाळवाडी येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गणेश भुते यांच्यासह पाचजण मंदिरात चप्पल घालून आले. त्यांना चप्पल घालून येऊ नका, असे म्हटल्यावर त्यांच्याशी वादावादी झाली. मंगळवारी दुपारी संबंधित जमावाने येऊन दोन मोटारी फोडल्या. शांताबाई मासाळ, प्रदीप दगडू पुकळे यांना मारहाण करून जखमी केले. शांताबाई यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र तोडले. मोटारीवर दगडफेक करून त्यातील ८२ हजारांची रक्कम चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, विष्णू लक्ष्मण अर्जुन (रा. आंबेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खासदार समर्थकांनी त्यांची मोटार (क्र. एमएच ०५ एएस ४७५३) फोडली. त्यांना मारहाण केली. खिशातील ५० हजारांची रक्कम हिसकावून घेतली. गळ्यातील सोन्याची साखळीही नेली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सायंकाळपर्यंत कुणालाही अटक केलेली नव्हती. अधिक तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे करीत आहेत.