नवी दिल्ली - लग्न म्हटलं की मजामस्तीसोबत अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादही आलेच. लग्नातील मानपान, जेवण, कपडे यावरून अनेकदा वर-वधूच्या कुटुंबीयांचे आपापसात खटके उडतात. कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की लग्नच मोडतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्नात तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. लग्नातच दोन्हीकडची मंडळी भिडले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. नवरदेवाच्या शेरवानीवरून वाद पेटला आणि लग्नमंडपातच दगडफेक करण्यात आली.
मध्य प्रदेशच्या मंगबेदा गावात ही अजब घटना घडली आहे. वधूच्या नातेवाईकांनी आपल्या परंपरेनुसार वराला धोती-कुर्ता घालायला सांगितला होता. पण त्याने शेरवानी घातल्याने हा वाद सुरू झाला. वधू आणि वर पक्ष आपसात भिडले. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. धामनोद पोलीस स्टेशनचे प्रभारी सुशील यदुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाने धोती-कुर्त्याऐवजी शेरवानी घातल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाले आणि वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं. दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार दिली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नवरदेवाने दिलेल्या माहितीनुसार, वधू पक्षाकडून काही वाद नव्हता पण त्याच्याकडून आलेले नातेवाईक त्यांना त्रास देत होते. नवरदेवाच्या काही नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलनही केलं. काही महिलांनी दावा केला आहे की, वधूच्या नातेवाईकांना दगडफेक केली ज्यामुळे लोक जखमी झाले आहेत. सध्या या प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.