हरियाणातील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या घरातून दीड लाखांची रोकड आणि दागिने घेऊन एक नवरी फरार झाली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. टीआयच्या एका रिपोर्टनुसार, अशोक कुमार आपल्या धाकट्या मुलासाठी मुलगी पाहत होते. मनीष नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांची मंजूशी ओळख करून दिली.
मंजूने अशोक कुमार यांच्या मुलासाठी एक आदर्श स्थळ माहीत असल्याचं सांगितलं. तसेच भावी वधूच्या कुटुंबाशी त्यांची ओळख करून दिली. आर्थिक अडचणीचा दावा करत मंजू आणि तिच्या एका साथीदाराने मुलीच्या कुटुंबाकडे पैशांची कमतरता असल्याचं सांगितलं. अशोक कुमार यांनी त्यांचे कुटुंब हुंडा मागणार नाही, असं आश्वासन दिलं. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये आणि काही कपडे देखील दिले.
26 जुलै रोजी कोर्ट मॅरेज केल्यानंतर अशोक कुमार आपल्या नवीन सूनसोबत घरी परतले. मात्र, रात्रभर आनंदोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वधू बेपत्ता झाली. चौकशी केली असता, सासरे अशोक कुमार यांना समजले की, सून दीड लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन पळून गेली होती. मंजूला कळवल्यावर तिने अशोक कुमार यांना वधूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
जेव्हा कुमार यांनी पुन्हा मंजूच्या साथीदाराशी संपर्क साधला तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर अशोक कुमार यांनी बिलासपूर पोलीस ठाण्यात नववधू, मंजू आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला. तपास सुरू असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.