मुंबई - मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरत असलेल्या महिलेसोबत दोन दिवसांपूर्वी एक विचित्र अपघात झाला. महिलेचा पदर लोकलच्या दरवाज्यातील हुकात अडकून ही महिला फलाटावर पडली आणि गाडी सुरु झाल्यानंतर फरफटत गाडी खाली जाणार तितक्यात आरपीएफ कॉन्स्टेबल राज कमल यादव आणि सुमितकुमार यादव यांनी त्या महिलेचा जीव वाचवला. आरपीएफ कॉन्स्टेबल राजकमल यादव आणि सुमितकुमार यादव यांनी केलेल्या धाडसाची आणि मदतीची दखल मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी कॉन्स्टेबलच्या सतर्कतेबद्दल त्यांचा सत्कार केला आहे. रोख रक्कम ५ हजार आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना बुधवारी सन्मानित करण्यात आले. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्विट करुन कौतुकाची थाप दिली आहे.
मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग स्थानकात मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला. या अपघाताचे दृश्य स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये चित्तथरारक दृश्य कैद झाले आहे. पूनम चेतन कालसानी नावाची महिला गाडीतून उतरत असताना तिचा पदर दरवाज्यात अडकला. त्याचवेळी गाडी सुरू झाली आणि महिला गाडीसोबत फरफटत गेली. महिला अक्षरशः गाडीखाली गेली असती. पण, स्थानकावर तैनात असलेले आरपीएफ जवान राजकमल यादव, सुमितकुमार यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. तिचा जीव वाचवताना ते स्वतःही पडले. पण ते त्वरीत उठले आणि महिलेचे प्राण वाचवले. या घटनेत महिलेचे प्राण वाचले असून महिलेसह दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.
नेमके काय घडले होते त्या दिवशी? जाणून घेण्यासाठी वाचा
http://www.lokmat.com/crime/two-rpf-jawans-survived-lady/