Police News : ठाण्यातील फलाट क्रमांक 3 आणि 4 वर गुरुवारी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
ठाणे : रेल्वे पोलीस हवालदार तुषार सोनताटे यांनी प्रसंगावधान राखत मदतीचा हात पुढे केल्याने एका तरुण प्रवाशाचा जीव वाचल्याची घटना गुरुवारी सकाळी ठाणेरेल्वे स्थानकामध्ये घडली. या घटनेने पोलीस आणि प्रवाशांनी सोनताटे यांचे कौतुक केले आहे. ठाण्यातील फलाट क्रमांक 3 आणि 4 वर गुरुवारी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
फलाट क्रमांक 4 वर डाऊन मार्गाकडे (कल्याणच्या दिशेने ) जाणारी एक उपनगरी रेल्वे आली. फलाट क्रमांक तीनवर असलेल्या तरुणाला या रेल्वेतून कल्याण दिशेने जायचे होते. उशीर झाल्यामुळे त्याने रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाचा वापर न करता फलाट क्रमांक तीन वरून पटरीवर उडी मारली आणि धावत फलाट क्रमांक चार गाठले. मात्र त्या तरुणाचा अंदाज चुकला आणि वेगाने येत असलेल्या रेल्वेची गती त्याला न कळल्याने तो स्तब्ध झाला. सुदैवाने,त्यावेळी याच फलाटावर गस्त घालत असलेले पोलीस हवालदार सोनताटे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तातडीने या तरुणाला मदतीचा हात पुढे करत त्याला फलाट क्रमांक चारवर खेचून घेतले. यावेळी सोनताटे यांनी क्षणाचा विलंब केला असता तर या तरुणाला रेल्वेच्या अपघातात आपला जीव गमवावा लागला असता अशी माहिती ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.