Salman Rushdie attacked: लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची एक मोठी घटना नुकतीच घडली. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील बफेलो जवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्या हल्ल्यात ते जखमी झाले. शुक्रवारी सकाळी व्याख्यान देण्यापूर्वी CHQ 2022 कार्यक्रमासाठी स्टेजवर असताना सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सलमान रश्दी यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहेत. या पुस्तकातील विचार मुस्लीमविरोधी असल्याचे काही मुस्लीम मूलतत्ववादींचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून त्यांना विविध प्रकारच्या धमक्या मिळत होत्या. आज न्यूयॉर्कमध्ये भर कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
आजच्या दिवशी एका वर्षापूर्वी इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रूहोल्लाह खुमैनी यांनी एक फतवा जारी केला होता. त्या फतव्याच्या माध्यमातून रश्दी यांची हत्या करण्याचे आवाहन करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर फतव्यामध्ये रश्दी यांची हत्या करणाऱ्याला ३ मिलियन डॉलर्सचे इनाम देण्याचीही घोषणा करण्यात आली होती. इराण सरकारने मात्र खुमैनी यांनी जारी केलेल्या फतव्याशी आमचा काहीही संबंध नाही असे बरेच वर्षांपासून सांगत आहे. पण तसे असले तरी सलमान रश्दी यांच्या विरोधातील भावना काहींच्या मनात अजूनही तितक्यात तीव्र आहेत. त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
२०१२ साली एका नीमअधिकारी दर्जाच्या इराणी धार्मिक फाऊंडेशनने रश्दी यांच्या हत्येवरील इनाम वाढवून ३.३ मिलियन डॉलर्स इतका केला. या संदर्भात रश्दी यांना जेव्हा विचारले होते तेव्हा त्यांनी मात्र या धमक्या गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या बक्षीसांमध्ये कोणालाही रस नसतो असेही ते म्हणाले होते. मात्र आज न्यूयॉर्कच्या बफेलो मध्ये एका कार्यक्रमात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.