नागपूर : कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घरातून अज्ञात आरोपीने रोख २७ हजार आणि सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण ९७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी ३० मार्चला दुपारी १.३० ते शुक्रवारी ३१ मार्चच्या रात्री २.३० दरम्यान घडली.
अभिषेक तुषारकांती घोष (३४, म्हाडा कॉलनी, गोपाल विहार खडगाव रोड वाडी) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील गोदरेजच्या आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागीने व रोख २७ हजार असा एकुण ९७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
सध्या शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत. यामुळे पालकांनी माहेरी, गावी जाण्यास सुरुवात केली आहे. चोरटे याच गोष्टीचा फायदा उठवत आहेत. घर बंद दिसले की, रात्रीच्या वेळी लाईट बंद दिसली की ते आपला डाव साधत आहेत. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी काहीवेळा अशा लोकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवून जाण्याची मोहिम सुरु केली होती. याचा काही प्रमाणावर फायदाही झाला होता.