पुणे : आंध्र प्रदेशच्या ट्रकचालकाने इंधन वाचविण्यासाठी उतारावर ट्रकचे इंजिन बंद करून गाडी न्यूट्रलवर चालविण्याचा प्रयत्न केला. तीव्र उतारामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकापाठोपाठ पुढील ४८ वाहनांना धडक दिल्याचे तपासणीत आढळले आहे.
रविवारी रात्री हा अपघात झाला होता. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली. उतार असल्याने डिझेल वाचविण्याच्या उद्देशाने चालकाने इंजिन बंद केले आणि गाडी न्यूट्रल गिअरमध्ये घेऊन तो गाडी घेऊन बिनधास्त निघाला होता. परंतु वेग प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटून वेळेत ब्रेक दाबता न आल्याने हा अपघात घडला.
या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. मणिराम छोटेलाल यादव असे चालकाचे नाव असून, तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार यांनी दिली.