लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: लेकीचा आंतरजातीय विवाह मंजूर नसल्याने तिची आई गुपचूप तिच्या साखरपुड्याला गेली. याचा राग मनात धरून वडिलांनी तिच्या डोक्यात हातोडीने हल्ला करत तिला गंभीर जखमी केली. तसेच तिच्यावर चाकूनेही वार केले. यात गीता शेट्टी (६८) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पती प्रभाकर (७९) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गीता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी प्रणिता (३८) हिचे निखिल सावे या तरुणावर प्रेम असल्याने येत्या ३० एप्रिल रोजी त्या दोघांचा प्रेम विवाह होणार होता. मात्र निखिल हा दुसऱ्या जातीचा असल्याने त्यांचे लग्न प्रभाकरला मंजूर नव्हते. त्यामुळे त्याने निखिलच्या घरी तसेच लग्नाच्या कार्यक्रमात येण्यास नकार दिला. त्यावरून गीता आणि प्रभाकर यांच्यात दोन ते तीन दिवसांपासून वाद सुरू होते आणि लग्नाला असलेला विरोध पाहता प्रभाकरचे नाव लग्न पत्रिकेत टाकण्यात आले नव्हते. दरम्यान २६ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास मालाडच्या साई पॅलेस हॉटेलमध्ये प्रणिता आणि निखिलचा साखरपुडा पार पडला. मात्र याबाबत गीता यांनी प्रभाकरला काहीच सांगितले नाही. कार्यक्रम संपल्यावर,२७ एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास त्या प्रणिता सोबत घरी आल्या आणि प्रभाकरला जेवण वाढून झोपी गेल्या.
झोपेत डोक्यावर बसला जोराचा फटका रात्री ३:३० च्या सुमारास त्यांच्या डोक्यावर जोराचा फटका बसल्याने त्यांना जाग आली तेव्हा प्रभाकर हा त्यांच्या डोक्यावर हातोडीने हल्ला करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्याला बाजूला सारायचा प्रयत्न केल्यावर त्याने बेडरूममध्ये ठेवलेल्या दोरीने त्यांचा गळा आवळला व चाकूने त्यांच्यावर वार केले. आईचा आवाज ऐकून प्रणिता मदतीला धावली तेव्हा त्याने तिच्यावरही चाकूने हल्ला चढवला. तिने प्रभाकरला पकडून शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले व जखमी मायलेकींना उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालय दाखल केले. प्रभाकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.