मुंबई : नोकरीसाठी युनायटेड किंगडम (यूके) येथे जाण्यासाठी नर्सिंगचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली. विमानतळावर कर्मचाऱ्याने व्हिसा प्रकरणात प्रश्न विचारताच त्याने केलेला बनाव उजेडात आला. याप्रकरणी सहार पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चिंतन वाझा असे आरोपीचे नाव असून, त्याने स्कील्ड वर्कर मायग्रंट व्हिसा मिळवला होता. यामुळे त्याला यूकेमध्ये नोकरी करणे शक्य होणार होते. मात्र, व्हिसा मिळवण्यासाठी त्याने अहमदाबाद येथील एका एजंटच्या माध्यमातून १५०० ब्रिटिश पौंड खर्च करून नर्सिंगचे बनावट प्रमाणपत्र मिळवले होते.
चिंतन वाझाने मुळात कॉम्प्युटर सायन्स या विषयात शिक्षण घेतले आहे. ज्यावेळी तो इमिग्रेशन काऊंटरवर गेला त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्याला त्याच्या व्हिसासंदर्भात प्रश्न विचारला. मात्र, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे अधिकाऱ्याला संशय आला. सखोल चौकशी केली असता त्याने बनावट प्रमाणपत्राची कबुली दिली.