नदिया - पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील हंसखली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका टीएमसी नेत्याच्या मुलाच्या बर्थडे पार्टीहून परतलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. संबंधित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि यानंतर तिचा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील, मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याचा मुलगा असल्याचा दावा मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
मृत्यूच्या चार दिवसांनंतर एफआयआर -संबंधित मुलगी ही 9 व्या वर्गात शिकत होती. तक्रारीनुसार, ही मुलगी सोमवारी दुपाच्या सुमारास बर्थडे पार्टीसाठी आरोपीच्या घरी गेली होती. मात्र तेथून परतली तेव्हा तीची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर चार दिवसांनी पीडितेच्या कुटुंबीयांनी टीएमसी नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर, आरोपीला अटक करून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
'रक्तबंबाळ होऊन परतली होती मुलगी' -पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे, की एका स्थानिक टीएमसी नेत्याच्या मुलाने, त्याच्या घरी बर्थडे पार्टी दिली होती. आमची मुलगी तेथून परतली, तेव्हा तिचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू होता आणि तिच्या पेटातही दुखत होते. मात्र, तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तसेच, "घटनेनंतर आम्ही पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांशीही बोललो. आम्हाला विश्वास आहे, की आरोपी आणि त्याच्या मित्रांनी माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला," असे मुलीच्या आईने म्हटले आहे.
'जबरदस्तीने केला अंत्यसंस्कार'पीडितेच्या आईने आरोप केला आहे, की "काही लोक आले होते आणि त्यांच्या मुलीचे मृत्यू प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वीच, ते तिचा मृतदेह घेऊन गेले व त्यावर अंत्यसंस्कार केले." यासंदर्भात बोलताना, टीएमसीचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महिला तथा बाल विकास मंत्री, शशी पांजा म्हणाले, संबंधित घटनेवरून कुठल्याही प्रकारचे राजकारण होऊ नये. पोलीस संबंधित घटनेची कसून चौकशी करतील आणि कारवाईही करतील.' यातच, विरोधी पक्ष असलेल्या भाजपने घटनेविरोधात हंसखलीमध्ये 12 तासांच्या बंदचे आवाहन केले आहे.