पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पुन्हा एकदा कोलकात्यात्याच्या आसपास तीन ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांत ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील आणखी एका फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रुपये रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने सापडले आहे. विशेष म्हणजे, हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या चमूला तब्बल 10 तास लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अर्पिताने हा पैसा फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवला होते.
ईडीने शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी नुकतेच पश्चिम बंगालच्या ममता सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक केली आहे. अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चटर्जी यांचे जवळचे संबंध आहेत. गेल्या 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ईडीने अर्पिताला 23 जुलै रोजीच अटक केली आहे.
महत्वाची बाब अशी, की ईडीच्या अधिकाऱ्यांना पार्थ चटर्जी यांच्या घरातून क्लास सी आणि क्लास डी सेवाच्या भरतीतील उमेदवारांशी संबंधित कागदपत्रेही मिळाली आहेत. समोर आलेल्या पुरव्यांनुसार ग्रूप डी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत पार्थ चटर्जी यांचा सक्रियपणे सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या या कारवाईनंतर, विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, विरोधी पक्षाने पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही, तर शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी ट्रेलची चौकशी करणाऱ्या ईडीने पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही चौकशी केली आहे.