नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. 44 जागांसाठी हे मतदान होत असून मागील दोन टप्प्यांतील हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाची मोठी परीक्षा आहे. विविध जागांवर हिंसाचार टाळण्याचे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे. उत्तर बंगालमधील कूचबिहार, अलीपुरदवार तसेच दक्षिण 24 परगणा, हावडा व हुगली जिल्ह्यातील 44 जागांवर मतदान होत आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. यामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आनंद बर्मन नावाच्या तरुणाला बाहेर ओढत आणण्यात आलं आणि गोळी मारुन त्याची हत्या केली. घटनेच्या वेळी मतदान सुरू होतं. या घटनेनंतर भाजपा आणि तृणमूलच्या समर्थकांमध्ये झडप झाली. यात बॉम्बही फेकण्यात आल्याने अनेक लोक जखमी झाले. केंद्रीय दलांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. तरुणाच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला आहे.
तृणमूल काँग्रेसने यात भाजपाचा हात असल्याचा केला आरोप
हत्या झालेला तरुण हा भाजपाचा समर्थक होता. त्यामुळेच त्याला गोळी मारल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने यात भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने हा तरुण मतदान केंद्रावर पोलिंग एजंट होता असा दावा केला आहे. तसेच याच दरम्यान भाजपा उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्या कारवर देखील हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चॅटर्जी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. लॉकेट चॅटर्जी यांनी यासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या
बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने बेदम मारहाण करत हत्या भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अश्विनी कुमार (Ashwini Kumar) हे एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली आहे. या प्रकारानंतर पोलीस विभागात संताप व्यक्त केला जात आहे.