पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक (West Bengal Election 2021) आठ टप्प्यांत घेतली जात आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंसेच्या घटना वाढू लागल्या आहेत. भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांनीच पक्षाच्या कार्यालय आणि नेत्यांवर काल दगडफेक केल्याची घटना घडली होती. आता भाजपाच्या खासदाराच्या (BJP MP) घराजवळ क्रूड बॉम्बद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एका लहान मुलासह 3 जण जखमी झाले आहेत. भाजपा या हल्ल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे. (Bombs have been hurled at around 15 places & CCTV cameras installed by police have been broken.)
भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांचे निवासस्थान उत्तर 24 परगनाच्या जगदलमध्ये आहे.जगदलच्या भागात बुधवारी रात्री 18 नंबरच्या गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत. हे ठिकाण बैरकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरापासून जवळच आहे. जवळपास 15 ठिकाणी बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही देखील हल्लेखोरांनी तोडले आहेत. एसीपी ए पी चौधरी यांनी एएनआय़ला सांगितले की, या बॉम्बफेकीमध्ये एक लहान मुलासह तीन जण जखमी झाले आहेत.
भाजपा खासदाराच्या घराजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक झाल्याने भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले की, टीएमसी म्हणजे हिंसाचाराची राजनिती आहे. आचार संहिता लागू होताच बंगालमध्ये बॉम्बफेक, गोळ्या झाडल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने हे इशारा म्हणून घ्यावे, नाहीतर मतदान शांततेत होण्याची शक्यता नाही.
पोलिसांवर खासदार संतापलेकाही अज्ञात लोकांनी 17 नंबरच्या गल्लीमध्ये बॉम्ब फेकले. मात्र, ते बॉम्ब 18 नंबरच्या गल्लीमध्ये पडले. बुधवारी सायंकाळी ही बॉम्बफेक करण्यात आली. यामुळे स्थानिकांमध्ये भयाचे वातावरण आहे. जगदल पोलीस घटनास्थळी पोहोचली असून स्थानिक लोकांनी पोलिसांसमोर संताप व्यक्त केला. एक बॉम्ब पोलिसांच्या समोरच पडल्याचे सांगण्यात आले. ही घटना समजताच प्रचारावर असलेले भाजपाचे खासदार अर्जुन सिंह घरी आले. त्यांनी पोलिसांना खडेबोल सुनावले. तसेच तुमच्याने काही होत नसेल तर इथून निघून जावे, असेही सांगितले.
गेल्या दहा, बारा दिवसांपासून आम्ही पोलिसांना सूचना दिली होती. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. आम्ही निवडणूक आयोगालाही सांगितले आहे. आता पुन्हा बॉम्बफेक झाली आहे. पोलिस सत्ताधाऱ्यांच्या आदेशावर काम करत असल्याने ते काहीच करत नाहीएत, असा आरोप खासदारांनी केला.