पश्चिम बंगालमधीलशिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता थेट राज्य सरकारमधील मंत्र्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असलेल्य पार्थ चटर्जी यांच्या घरी शुक्रवारपासूनच ED ची टीम तपास करत होती. आता पार्थ चटर्जी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, सकाळच्या वेळीच आपली प्रकृती बरी नसल्याचे पार्थ चटर्जी यांनी म्हटले आहे. यानंतर दोन डॉक्टरांचा चमूही घटनास्थळी पोहोचला होता. याशिवाय पार्थ यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांनाही ED ने ताब्यात घेतले आहे. ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ चटर्जी यांना अटक केल्यानंतर, मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. पार्थ यांना कोलकात्यातील CGO कॉम्प्लेक्समध्ये नेण्यात आले आहे. शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांची अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ED ने छापा टाकला होता. त्यांच्या घरातून तब्बल 20 कोटीच्या जवळपास कॅश हस्तगत करण्यात आली आहे.
कोण आहेत अर्पिता मुखर्जी? -ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेल्या अर्पिता मुखर्जी या बांगला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या. अर्पिता मुखर्जी यांनी त्यांच्या फिल्म करिअरमध्ये साइड रोल केले आहेत. बांगला सिनेमासोबतच ओडिया आणि तामिळ सिनेमातही त्यांनी काम केले आहे.
अर्पिता मुखर्जी यांनी बांगला सिनेमातील सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांचा लीड रोल असणाऱ्या काही सिनेमातही काम केले आहे. अमर अंतरनाड या सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे. ईडीच्या कारवाईत अर्पिताच्या घरी 20 कोटी रोकड सापडल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.