नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह असताना आता एक खळबळजनक घटना घडली आहे. बिहारमधील बेतिया गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या काही नातेवाईकांनी विषारी दारू प्यायल्याने या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होती. बेतिया येथे काही जणांनी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले. त्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि यातच 8 जणांचा मृत्यू झाला.
मृतकांचा आकडा वाढण्याची भीती
अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणेकडील तेलहुआ गावात ही घटना घडली. मृतकांमधील सर्व जण हे वॉर्ड क्रमांक 2, 3 आणि 4 मधील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गावातील या सर्वांनी दारूचे सेवन केले आणि त्यानंतर रात्री उशीरा सर्वांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली.
त्रास होत असलेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मृतकांची नावे समोर आली असून यामध्ये बच्चा यादव, महाराज यादव, हनुमंत सिंह, मुकेश पासवान, जवाहर सहनी, उमा साह, रमेश सहनी आणि राम प्रकाश यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.