काय सांगता? अमेझॉनवरुन गांजाची विक्री, कंपनीला पोलिसांची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 01:43 PM2021-11-16T13:43:36+5:302021-11-16T13:53:50+5:30
मध्य प्रदेशातील पोलिसांनी भिंड येथे एका ड्रग्ज पॅडलर रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या रॅकेटने कथितप्रकरणी अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन गोड पानांच्या विक्रीचे कारण देत गांजाची विक्री केली होती.
भोपाळ - ऑनलाईन शॉपिंगची सध्या बाजारात चांगलीच चलती आहे. दिवाळीच्या काळात फेस्टीव्हल ऑफर आणि ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून या ऑनलाईन शॉपिंग साईट्सने आकर्षित केले होते. मात्र, आता अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन गांजाची विक्री होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आल आहे. लहान व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कंफडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सने हा आरोप लावला आहे. तसेच, नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबीने याचा तपास करावा, अशी मागणीही संघटनेनं केलीय.
मध्य प्रदेशातीलपोलिसांनी भिंड येथे एका ड्रग्ज पॅडलर रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या रॅकेटने कथितप्रकरणी अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन कडीपत्त्याच्या पानांच्या विक्रीचे कारण देत गांजाची विक्री केली होती. अमेझॉनच्या माध्यमातून काही लोकांनी 390 पॅकेट्समधून जवळपास 1 किलो गांजा, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरज पवैया आणि विजेंद्रसिंह तोमर नामक दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याचे कॅट संघटनेने सांगितले.
सीएआयटी (कॅट) या संघटनेच्या तक्रारी मागणीनंतर अमेझॉन कंपनीनेही स्पष्टीकरण दिलं असून स्वत: कंपनीकडून याचा तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आलंय. तसेच, देशात प्रतिबंध असलेल्या कुठल्याही उत्पादन किंवा वस्तूच्या विक्रीला कंपनीच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरुन परवानगी देण्यात येत नसल्याचेही अमेझॉनने म्हटले आहे. दरम्यान, भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, ड्रग्ज पॅडलर्सजवळ अमेझॉनचे पॅकेट्स मिळाले असून याप्रकरणी पोलिसांनी अमेझॉन कंपनीला नोटीस बजावली आहे.