पुणे - लॉकडाऊनच्या काळात पतीपत्नी बराच काळ एकत्र राहिल्याने त्यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरुन वादविवाद होऊ लागले. त्यात दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढल्याने ही प्रकरणे अधिकच ताणली जाऊन ती पोलिसांपर्यंत पोहचली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिलांच्या तक्रारी निम्म्याहून कमी झाल्या असताना पुरुषांकडून आलेल्या तक्रारीत मात्र दीडपट वाढ झाली आहे. पुरुषांचाच अधिक छळ झाल्याचे या तक्रारीवरुन दिसून येत आहे.भरोसा सेलकडे १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ मध्यये ५४४ पुरुषांनी तक्रारी केल्या होत्या. यंदा मात्र त्यात वाढ होऊन तब्बल ७१३ पुरुषांनी आपल्याला पत्नीकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाढतोय वादस्त्री-पुरुषांकडून येणाऱ्या तक्रारींमध्ये सध्या लग्नानंतर अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात क्षुल्लक कारणांमध्ये दोघांकडच्या नातेवाईकांकडून हस्तक्षेप केला जाऊ लागल्याने वाद वाढल्याचे व त्यातून भांडणाचे टोक गाठले जात असल्याचे भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींवरुन दिसून येऊ लागले आहे.- सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल एकमेकांविषयी संशय एकमेकांविषयी संशय हा पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या अनेक तक्रारींचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. एकमेकांच्या नकळत मोबाइल चेक करणे, त्यातून दुसऱ्याविषयी संशय निर्माण होतो. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ या म्हणीप्रमाणे एकमेकांविषयी कळत न कळत संशय निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. त्याचबरोबर पत्नी व तिच्या घरातील लोकांचा संसारामध्ये होणारा हस्तक्षेप हे आणखी एक महत्त्वाचे कारण पुरुषांच्या तक्रारीत दिसून आले.