मुंबई - अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून एनसीबीने ताब्यात घेतलेल्या परदेशी नागरीकाच्या पोटातून ७० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. सध्या या परदेशी नागरिकाला जे जे रुग्णालयात मेडिकल ऑब्सर्व्हेशनखाली ठेवण्यात आले आहे. साऊथ अमेरिकन कोकेन या अमली पदार्थाची किंमत १० कोटी रुपये आहे. परदेशी नागरिक असलेल्या या आरोपीचे नाव फुमो एमॅनुअल झेडेक्युआईस असं आहे.
हा आरोपी आफ्रिकी देशाचा नागरीक आहे. मोझाम्बिक्यू येथील हा नागरिक आहे. रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. कतार एअरलाईन्सने तो मुंबईत आला होता. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ७० कॅप्सूल काढल्या. त्यात १. ०५० किलो कोकेन सापडले आहे.
या परदेशी नागरिकाच्या चौकशीत त्याल एका व्यक्तीने हे अमली पदार्थ दिले होते. ते मुंबईत आणण्यासाठी काही रक्कम देण्याचे कबुल केले होते. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम स्वीकारले होते. आरोपी स्वतःला व्यावसायिक असल्याचे भासवत होता. त्याचा तिकीट खर्चही परदेशातील आरोपीने केला होता. आतापर्यंत केलेल्या कारवाईत शरीरातून जप्त केलेले हे सर्वात जास्त अमली पदार्थ असल्याचे एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितले.