मुंबई : गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच बीट चौकीतून चोरी झालेल्या पोलिसाचालॅपटॉप आणि सरकारी कागदपत्रे शोधण्याची वेळ आली आहे. गुन्ह्याचा तपासासाठी बिट चौकी बंद करून बाहेर पडताच, चोरट्याने बिट चौकीतून पोलिसांची बॅग पळवल्याची घटना नागपाडामध्ये समोर आली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवत तपास करत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक सचिन तावरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी ते नागपाडा येथील शुक्लाजी स्ट्रीट येथील बिट चौकीत कार्यरत होते. यादरम्यान बेपत्ता असलेली महिला गल्ली क्रमांक ११ मध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, ते तपासासाठी रवाना झाले. जाण्यापूर्वी त्यांची लॅपटॉप सहित कागदपत्रे असलेली बॅग बिट चैकीमधील टेबलखाली व्यवस्थित ठेवली. जाताना बाहेरून दरवाजा बंद केला. ४५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेसह मुलाचा शोध घेत त्यांना पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. ते सव्वा चारच्या सुमारास पुन्हा बिट चौकीकडे परतले. तेव्हा, बॅग गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी सगळीकडे शोध घेतला मात्र बॅग मिळून आली नाही. शिवाय जाण्यापूर्वी चौकीत असलेल्या अधिकाऱ्याकडेही चौकशी केली. मात्र त्यांनाही बॅगेबाबत काहीही माहिती नसल्याचे समजले. अखेर त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध सुरु आहे.
सीसीटीव्हीमध्ये चोर कैद..बिट चैकी येथे असलेल्या षासकिय सी.सी.टि.व्ही कमेऱ्याची पाहणी केली असता, साधारण चारच्या सुमारास २२ ते २५ वर्षाचा तरुण कडी उघडून आतमधील बॅग घेऊन बाहेर जाताना दिसत आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहे. अद्याप आरोपीची माहिती मिळाली नसून अधिक तपास सुरु असल्याचे नागपाडा पोलिसांनी सांगितले.